चाकणमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

284

चाकण, दि. १२ (पीसीबी) – भरधाव टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास तळेगाव चाकण रस्त्यावर घडली.

फारुख सैफुल्ला पठाण (वय ३३, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे टेम्पोच्या धडकेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याप्रकरणी युनूस सैफुल्ला पठाण (वय ३९, रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे. मूळ रा. राजीव गांधी नगर, शेलू, जि. परभणी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार संदीप रामदास वारे (रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) या टेम्पोचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास फारुख तळेगाव चाकण रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी संदीप वारे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो (एमएच /११ / एम/५२९९) भरधाव वेगाने चालवून फारुख याला जोरदार धडक दिली. यामध्ये फारुख यांचा जागीच मृत्यू झाला आणि टेम्पो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकला. यामध्ये  टेम्पो चालक संदीप देखील जखमी झाला. पोलिसांनी टेम्पो चालक संदीप याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.