चाकणमध्ये पोलिसांच्या दक्षतेमुळे एटीएम फोडीचा प्रकार उधळला; २७ लाखांची रोकड वाचवण्यात पोलिसांना यश

908

चाकण, दि. ९ (पीसीबी) – चाकणमधील कुरुळी येथे अॅक्सीस बँकेच्या एटीएम फोडून त्यातील रोकड पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना चाकण पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई आज (मंगळवार) पहाटेच्या तीनच्या सुमारास चाकण पोलिस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या कुरुळी गावातील अॅक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरवर करण्यात आली. यामध्ये एटीएममध्ये असलेली तब्बल २७ लाखांची रोकड चोरी होण्यापासून वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

चेतन शिवाजी राऊत (वय २५, बलुतआळी, चाकण) आणि गणेश प्रकाश नाईक (वय २०, रा. भुजबळ आळी चाकण) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अॅक्सीस बँकेचे विनायक तुकाराम केंजळे (वय २८, रा. भोसरी) यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) पहाटे तीनच्या सुमारास चाकण पोलिस नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या  कुरुळी गावात गस्त घालत होते. यावेळी तेथील अॅक्सीस बँकेच्या एटीएम सेंटरवर संशयास्पद हालचाल आढल्याने पोलिसांनी तेथे मोर्चा वळवला. पोलिस येत असल्याचे पाहुन चौघा चोरट्यांनी पळ काडण्याचा प्रत्यन केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन चेतन आणि गणेश याना दोघा आरोपींना अटक केली तर इतर दोघेजण फरार झाले. पोलिसांना घटनास्थळावरुन एक चोरीची दुचाकी, एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन पार आढळून आल्या आहेत. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. दरम्यान एटीएम फोडण्याचा प्रयत्न झालेल्या एटीएममध्ये तब्बल २७ लाखांची रोकड होती. ते वाचवण्यात पोलिसांना यश आले असून फरार दोघा आरोपींचा शोध सुरु आहे.

ही कारवाई झोन-१ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, पोलिस कॉन्स्टेबल नवनाथ खेडकर, ग्राम सुरक्षा दलातील दिनेश सांगडे, भास्कर कठारे यांच्या पथकाने केली.