चाकणमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिकाला लुटले

165

चाकण, दि. २१ (पीसीबी) – हॉटेलमध्ये घुसून चौघा टोळक्यांनी काऊंटरवर उभा असलेल्या एका हॉटील व्यवसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून काऊंटरच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम ९ हजार ८६० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२०) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण मेदणकरवाडी गावच्या हद्दीतील हॉटेल शिवराजमध्ये घडली.

याप्रकरणी हॉटेल व्यवसायिक काळुराम आनंदा खांडेभराड (वय ४४, रा. कडाचीवाडी ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अमोल माऊली लष्करे, अमोल विनायक ओव्हाळ (दोघे रा. कडाचीवाडी, खेड), संतोष ननावरे आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळुराम खांडेभराड हे हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांचे मेदणकरवाडी येथे शिवराज नावाचे हॉटेल आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ते हॉटेलच्या काऊंटरवर उभे असताना चौघे आरोपी तेथे आले. त्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून काऊंटरच्या ड्रॉवरमधील रोख रक्कम ९ हजार ८६० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस उपनिरीक्षक पासलकर तपास करत आहेत.