चाकणमध्ये दुचाकीवरील तिघांनी तरुणाचा मोबाईल हिस्कावला; एक अटक दोघे फरार

165

चाकण, दि. १२ (पीसीबी) – बसची वाट पाहत उभा असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीस्वारांनी जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला. याप्रकरणातील एका आरोपीला नागरिकांनी चोप देऊन चाकण पोलिसांच्या ताब्यात दिले.  ही घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी चारच्या सुमारास चाकण येथील पुणे नाशिक रोडवर असलेल्या स्वयंवर मंगल कार्यालयासमोर घडली.

विकास प्रकाश पाटील (वय २३, रा. विनायक पार्क, चाकण. मूळ रा. सिंदखेडा, जि. धुळे) असे मोबाईल हिस्कावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनायक लक्ष्मण थिगळे (रा. वरची भांबुरवाडी, खेड, जि. पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास चाकण मधील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर फिर्यादी विकास बसची वाट पाहत उभा होता. त्यावेळी (एमएच/१४ / ई आर/७०८४) या पल्सर मोटारसायकल वरून आलेल्या तीनजणांनी मिळूण विकासच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला आणि पसार झाले.  ही घटना विकासने त्याच्या नातेवाईकाला सांगितली. दोघे मिळून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, तेथे मोबाईल फोन हिसकावणाऱ्या एकाला  नागरिकांनी पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. विकासने त्याला ओळखले तो आरोपी विनायक होता. पोलिसांनी विनायक याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. चाकण पोलीस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत.