चाकणमध्ये दुचाकीचा धक्का लागला म्हणून चौघा टवाळखोरांनी दोघांना लुटले

335

आळंदी, दि. २६ (पीसीबी) – दुचाकीचा धक्का लागला म्हणून चार जणांच्या टोळक्यांनी दुचाकीवरील इसमाच्या खिशातील पाच हजार रुपये आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. ही घटना शनिवारी (दि.२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास चाकण नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये घडली.

गणपत सोपानराव पोळ (वय ३६, रा. उंबरी, जि. बीड) आणि त्यांची मेहुणी या दोघांना लुटण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार स्वयंभू मल्हार काळे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी फिर्यादी गणपत हे त्यांच्या मेहुणीला चाकण येथून आणण्यासाठी गेले होते. यावेळी चाकण नगरपरिषदेच्या पार्किंगमधून ते त्यांची दुकाची काढत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्याची मेहुणी देखील होती. गाडी काढत असताना त्यांच्या दुचाकीचा धक्का आरोपी काळे यांच्या दुचाकीला लागला. यावरून पोळ आणि काळे यांच्यात वाद झाला. यामुळे काळे आणि त्यांच्या तीन साथीदारांनी जबरदस्तीने पोळ यांच्या खिशातून पाच हजार रुपये आणि त्यांच्या मेहुणीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पसार झाले. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी स्वयंभू मल्हार काळे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करत आहेत.