चाकणमध्ये उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच केली मित्राला मारहाण

461

चाकण, दि. १७ (पीसीबी) – मित्राला घर बांधण्यासाठी उसने दिलेले पैसे परत मागीतले म्हणून मित्रानेच मित्राचे अपहरण करुन जबर मारहाण करत जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवार (दि.१५ ऑगस्ट) सायंकाळी पाचच्या सुमारास चाकण येथे घडली.

अमित संजय साळवे (वय १९, रा. जय भारत चौक, चाकण) असे मारहाण होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित मिसर, अजिंक्य राणे, दिपक परदेशी, आदित्य मेदनकर, महादू (सर्व रा. चाकण) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अमित आणि आरोपी रोहित हे एकमेकांचे ओळखीचे असून  मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी घर बांधण्यासाठी अमितने रोहितला ११ हजार रुपये दिले होते. मात्र बरेच दिवस उलटून देखील रोहितने अमितला ते पैसे परत केले नाही. यामुळे अमितने रोहितकडे पैसे मागीतले असता रोहीतने त्यांचे मित्र अजिंक्य, दिपक, आदित्य, महादू यांच्यासोबत मिळून बुधवारी सायंकाळी अमितचे अपहर केले. त्याला एका फ्लॅटवर नेवून लोखंडी रॉड आणि दांडक्याने जबरमारहाण केली. तसेच जाळून टाकण्याची धमकी दिली. जखमी अमितने चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चाकण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.