चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू

118

चाकण, दि. २६ (पीसीबी) – भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना चाकण एकतानगर येथील नाशिक हायवेवर घडली.

जयसिंग सुनार (वय २५, रा. कमलबजार नगरपालिका ७ अच्छाम, नेपाळ, सध्या रा. शिरवली ता. खेड, जि पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवार (दि.२५) चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२३) रात्री साडेआठच्या सुमारास जयसिंग हा चाकण एकतानगर येथील नाशिक हायवे ओलांडत होता. यावेळी नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्याला जोरदार धडक दिली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जयसिंगचा मृत्यू झाला. चाकण पोलीस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.