चाकणच्या खराबवाडीत अवघ्या १९ वर्षांच्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

3056

चाकण, दि. ९ (पीसीबी) – चाकणच्या खराबवाडीमध्ये महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या वादातून टोळक्याने दोन तरूणांवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि. ८) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय १९, रा. राणूबाईमळा, चाकण) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या हल्ल्यात पियुष शंकर धाडगे (वय १९, रा. राणूबाईमळा, चाकण) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पियुष धाडगे आणि अक्षय शिंदे यांच्यात वर्षभरापासून वाद सुरू होते. त्यातून पियुष हा आपला खून करणार असल्याची माहिती अक्षयला मिळाली होती. त्यामुळे त्याने आपला खून होण्यापूर्वीच पियुषचा काटा काढण्याचा मित्रांसोबत कट रचला. त्यानुसार त्याने पियुषला फोन करून वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावले.

त्यानुसार पियुष हा प्रशांत बिरदवडे याला सोबत घेऊन चाकण-तळेगाव रस्त्यावर खराबवाडी गावाच्या हद्दीत सोनालिका गृहप्रकल्पाच्या समोर अक्षयला भेटण्यासाठी गेला. पियुष आणि अक्षय यांच्यात चर्चा सुरू होताच अक्षय आणि त्याच्यासोबत आलेल्या सात-आठ जणांनी पियुषवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पियुषने तेथून पळ काढला. मात्र त्याच्यासोबत आलेला प्रशांत बिरदवडे हल्लेखोरांच्या तावडीत सापडला आणि त्याचा नाहक बळी गेला.

या हल्ल्यात खून झालेल्या प्रशांतचा मृतदेह अर्धा तास जागेवर पडून होता. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पियुष धाडगे आणि प्रशांत बिरदवडे हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. दोघेही येरवडा जेलमधून नुकतेच सुटून आले होते. या दोघांवर हल्ला करणाऱ्यांपैकी अनेकांवर दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. प्रशांतचा खून केल्यानंतर अक्षय शिंदे व त्याचे साथीदार पसार झाले असून, चाकण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.