‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’; शिवसेनेची मुंबईत फलकबाजी

147

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीत जाऊन राम दर्शन आणि गंगा पूजा करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसैनिकांनी ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’ असे फलक लावले आहेत. भाजपाकडून राम मंदिर पूर्ण करण्याचे आश्वासन हवेत विरले आहे. त्यामुळे हिंदू मतांना आकृष्ट करण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या पोस्टरवर ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी पाऊल’, असा मजकूर छापण्यात आला आहे. तसेच या दौऱ्यात शिवसैनिकांनी सामील व्हावे, असे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी  हिंदू मतांना कॅश करण्यासाठी शिवसेनेने हा दौरा आखल्याचे बोलले जात आहे.

आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून शिवसेनेकडे युतीसाठी विनवण्या सुरु असल्या तरी शिवसेनेने मात्र, स्वबळावर ठाम राहण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. संसदेतील अविश्वास प्रस्तावातही शिवसेनेने तटस्थ भूमिका घेत भाजपला सुचक इशारा दिला आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातूनही सतत भाजपविरोधी कुरघोड्या सुरू आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत भाजपच्या मतांना वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.