चऱ्होली येथून अपहरण केलेल्या व्यावसायिकाची सुटका   

113

भोसरी, दि. १७ (पीसीबी) – एका व्यावसायिकाला अडवून गाडीला कट का मारला, असा जाब विचारून त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून सोडून देण्यात आले. हा प्रकार मंगळवारी (दि. १६) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चऱ्होली येथे घडला.

डॉ. शिवाजी पडवळ ( वय.५५ रा.धायरी) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नांव आहे. पडवळ यांची मरकळ येथे राठी पॉलीबॉड नावाची कंपनी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळ मंगळवारी सायंकाळी आपल्या कारमधून घरी निघाले होते. चऱ्होली येथे आले असता आरोपींनी त्यांची कार अडवून आमच्या गाडीला कट का मारला, असा जाब विचारला. तसेच त्यांनी पडवळ यांच्या कारचालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर पडवळ यांना कारमध्ये घेऊन त्यांनी पळ काढला.

दरम्यान, आरोपींनी पडवळ यांना केडगाव चौफुला येथील पंजाबी ढाब्याजवळ सोडल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ जाऊन पडवळ यांना ताब्यात घेतले. पडवळ यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना उपचारासाठी यवत जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहे.