चऱ्होलीत मजूर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

59

दिघी, दि. २८ (पीसीबी) – चऱ्होलीत एका मजूर दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी तिनच्या सुमारास उघडकीस आली.

उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३७) आणि पत्नी मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१, दोघेही रा. भोसले वस्ती, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) दुपारी तिनच्या सुमारास सूर्यवंशी दाम्पत्याने त्यांच्या चऱ्होली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर शेजाऱ्यांनी दिघी पोलिसांना दिली. यावर दिघी पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेत उत्तम आणि त्यांची पत्नी मुक्ता या दोघांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषीत केले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.