चऱ्होलीतील मजूर दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणी ठेकेदाराला अटक

38

भोसरी दि. २ (पीसीबी) – चऱ्होलीत २८ जून रोजी एका मजूर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने लिहिलेल्या चिठ्ठीनुसार ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे.

भरत हनुमान काळे (वय २९, रा. दाभाडे वस्ती चऱ्होली) असे अटक करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मुक्ता उत्तम सूर्यवंशी (वय ३१) आणि उत्तम तुकाराम सूर्यवंशी (वय ३३) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम सूर्यवंशी हे आरोपी भरत काळे यांच्याकडे कामाला होते. काळे यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे न दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला होता.  तसेच आरोपी काळे याने केबलचे बंडल चोरल्याबाबत सूर्यवंशी यांनी मुख्य ठेकेदारास सांगितले होते. या कारणावरून देखील त्या दोघांमध्ये भांडण झाले होते.

दरम्यान, या सर्व त्रासाला कंटाळून सूर्यवंशी दाम्पत्याने २८ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.  आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे लिहीलेल्या चिठ्ठीनूसार पोलिसांनी ठेकेदाराला अटक केली आहे. दिघी पोलिस तपास करत आहेत.