चंद्राबाबू नायडूंनी गेल्या २४ तासांत दोनदा घेतली राहुल गांधी, शरद पवारांची भेट

139

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – लोकसभा निडणुकीच्या अखेरच्या ७ व्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. तर दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू  यांनी गेल्या २४ तासांत  दोनदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांची देखील भेट घेतली. तर संध्याकाळी ते युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

यापूर्वी चंद्राबाबूंनी शनिवारी   समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांची भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून भाजपला सत्तेतून दूर करण्यासाठी पंतप्रधानपदाचा त्याग करण्याची तयारी असल्याचे विधान आले होते. त्यामुळे महाआघाडीत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोण असतील, याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, महाआघाडीबाबत शरद पवार यांनी म्हटले आहे की, सर्वच पक्ष आता २३ मे ची वाट पाहत आहेत. दरम्यान, निकाल समोर येईल त्यानंतरच स्पष्टपणे काहीतरी सांगता येईल. तर भाजपाला बहुमत मिळाले नाही, तर संभाव्य आघाडीबाबत चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी २३ मे रोजी २१ विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.