चंद्रकांत पाटलांमध्ये सहनशीलता राहिली नाही – अजित पवार

176

पुणे, दि. ९ (पीसीबी) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा’  अशा प्रकारची उत्तरे देण्याचे कारण नाही. माझा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे, असे बोलू नका. चंद्रकांत पाटलांमध्ये सहनशीलता राहिली नाही. अनेक नवनवीन प्रश्न समोर उभे असतात, मात्र अशा प्रकारची टोकाची उत्तरे देऊन त्यातून काहीही साध्य होत नाही. अशी विधाने अपयशाच्या भावनेतून केलेली असून हे चुकीचे आहे, असे ही राष्ट्रावादीचे नेते अजित पवार  यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल. शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर, खोत, शेट्टी या सगळ्याचा समतोल करत कसे पुढे जायचे हे लक्षात येईल. पण यशस्वीपणे समतोल साधत आम्ही चार वर्ष पूर्ण केली. एक वर्षही पूर्ण होईल. पुन्हा निवडणूक जिंकू, पुन्हा शिवसेना, भाजप, आरपीआय, जानकर सदाभाऊ खोत, परत आले तर शेट्टीसाहेब सगळे एकत्र येऊ. यावर अजित पवारांनी टिप्पणी केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अमेरिकेसारख्या देशात पेट्रोल ४५ रुपये प्रतिलीटर दराने विकले जाते. मात्र महाराष्ट्रात लवकरच हा दर शंभरी पार करणार आहे. पेट्रोलसोबत गॅसच्या दरानेही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे, असे अजित पवार म्हणाले.