चंद्रकांत पाटलांनी बारामतीतून विधानसभा लढवून दाखवावी; अंकुश काकडेंचे आव्हान

116

पुणे, दि. २६ (पीसीबी) –  पुण्याचे पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगमी विधानसभा निवडणूक बारामतीतून लढवून दाखवावी. एकदा होऊन जाऊ दे दुध का दुध, पाणी का पाणी, असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी  दिले आहे. अजित पवार यांचे काय करायचे ते बारामतीची जनता ठरवेल. त्याची उठाठेव चंद्रकांतदादांनी करू नये, असा सल्लाही काकडे यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आमचे टार्गेट असले, तरी ते प्रॅक्टिकल असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणे हेच आमचे मुख्य टार्गेट असेल, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केले होते.

या विधानाचा खरपूस समाचार घेताना काकडे यांनी पाटील यांच्या पलटवार केला. अजित पवार यांचे काय करायचे ते बारामतीची जनता ठरवेल. त्याची उठाठेव चंद्रकांतदादांनी करू नये, आणि करायची असेल, तर त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी, असे आव्हान काकडे यांनी दिले.

भाजपच्या नेत्यांना गांधी घराणे आणि पवार घराणे सोडून दुसरे काहीही दिसत नाही. ते उठसुठ पवार यांच्यावरच टीका करत सुटले आहेत,  असा आरोप करून राज्यातील दुष्काळ, पाणी प्रश्न, आरक्षण असे महत्वाचे प्रश्न समोर असताना त्यांना फक्त बारामतीचीच काळजी आहे, असे काकडे यांनी  म्हटले आहे.