चंद्रकांतदादांनी ‘ते’ संभाषण उघड करावे – खासदार संभाजीराजे

764

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – आषाढी ‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागले आहे,’ असा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावर दादांनी ते संभाषण उघड करुन सर्वांसमोर आणावे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.  

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, मला विश्वास आहे मराठा समाज अशा पद्धतीचे कृत्य कदापि करु शकणार नाही. साडेतीनशे वर्षे आम्ही हे कधी केले नाही. असली विकृत कल्पना मराठा करु शकत नाही. त्यामुळे सरकार खोटे बोलत नाही, हे दाखवून देण्यासाठी चंद्रकांतदादांनी पुरावे द्यावेत, असे संभाजीराजे म्हणाले.

‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचे फोनवरील संभाषण आमच्या हाती लागले आहे,’ असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला होता. ‘वारीमध्ये साप सोडून चेंगराचेंगरी घडवून आणण्याचा कट रचणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांवर सरकारने कारवाई सुरु केली आहे,’ अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.