“घोडं कुठं अकडलंय? कुंथत कुंथत सरकार चालत नाही”, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

11

मुंबई, दि. २९ (पीसीबी) : “राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णया घेण्याची, असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही”, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली.

राज ठाकरे पहिल्यांदाच राज्यपालांना भेटणार असल्याने या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट 10 ते 15 मिनिटांची होती. या भेटीनंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीचं कारण उघड करत म्हणाले, “लॉकडाऊननंतर राज्यातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. ही बिले कमी व्हावीत आणि नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून राज्यात ठिकठिकाणी मनसेने आंदोलने केली. अदानीसह अनेकजण भेटूनही गेले. एमईआरसीने मान्यता दिली तर आम्ही वीज बिल कमी करू असं ते म्हणाले. त्यांचे लेखीपत्रंही आमच्याकडे आहे. तर त्या कंपन्या स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, असं एमआरसीने म्हटलं आहे. कंपन्या आणि सरकारचं एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे. या संदर्भात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशीही बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते म्हणाले. हा विषय आज राज्यपालांच्या कानावर टाकला. त्यावर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही पवारांशी बोलून चर्चा करू,” असं राज म्हणाले.

आज वाढीव वीजबिल येत आहेत. हा प्रश्न राज्य सरकारलाही माहिती आहे. जिथे दोन हजार बिल येत होतं, तिथे दहा-दहा हजार बिल येत आहे. जिथे ५ हजार येत होतं, तिथे २५ हजार येत आहे. मग हे राज्य सरकारला जर हे माहिती आहे, तर कशामध्ये हे प्रकरण अडकलंय ते माहिती नाही, असं सांगतानाच विषय खूप आहेत. रेल्वे सुरू होत नाही. मंदिरांचा प्रश्न आहे. अकरावी प्रवेशाचा प्रश्न आहे. पण आज फक्त वाढीव बिलाबाबतच राज्यपालांशी चर्चा झाली. तशी प्रश्नांची कमतरता नाही. फक्त निर्णयाची कमतरता आहे. आता सरकारने निर्णय घेतले पाहिजे. सरकार का निर्णय घेत नाही? कुठं घोडं अकडलंय? कशासाठी हे कुंथत आहेत? कुंथत कुंथत सरकार चालत नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी सरकाराला लगावला.

WhatsAppShare