घराचे खरेदीखत करुन देतो असे सांगून थेरगावातील घरकाम करणाऱ्या महिलेची साडेचार लाखांची फसवणूक

339

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – घराचे खरेदीखत करुन देतो असे सांगून थेरगावातील एका घरकाम करणाऱ्या महिलेला भोसरीतील दाम्पत्याने तब्बल ४ लाख ४७ हजारांचा गंडा घातला आहे. ही फसवणूक ऑक्टोबर २०१७ ते आज पर्यंत करण्यात आली.

शिवनंदा भागवत अनसरवाडे (वय ३८, रा. सी/ओ, संतोष बारणे चाळ, थेरगाव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार प्रकाश दत्ताराम पांचाळ आणि त्याची पत्नी प्रांजल प्रकाश पांचाळ (दोघे रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवनंदा या घरकाम करुन पोट भरतात. आरोपी पांचाळ दाम्पत्याने ऑक्टोबर २०१७ मध्ये शिवनंदा यांच्याकडून घराचे खरेदीखत करुन देण्याच्या बहाण्याने ४ लाख ४७ हजार रुपये  घेतले होते. मात्र एक वर्ष उलटून गेले तरी सुध्दा पांचाळ दाम्पत्याने शिवनंदा यांना घराचे खरेदीखत करुन दिले नाही. तसेच याबाबत काही विचारल्यास आणि पैसे परत मागीतल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.