घरफोडी करून पळवले दागिने

58

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – मुळशी तालुक्यातील नेरे गावात दोन घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 17 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 18 ते 22 जून या कालावधीत घडली.

विकास जगन्नाथ पवार (वय 33, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 24) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे शेजारी सतीश जाधव यांच्या घरात चोरी झाली आहे. त्यांची घरे कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. फिर्यादी यांच्या घरातून 50 हजारांचे डोरले, सात हजार 500 रुपयांचे लॉकेट, सात हजार 500 रुपयांची अंगठी, पाच हजारांची सोन्याची नथ असा 70 हजारांचे दागिने चोरून नेले. तर त्यांचे शेजारी सतीश जाधव यांच्या घरातून 17 हजार 500 रुपयांचे डोरले, 12 हजार 500 रुपयांचा हार, 17 हजार 500 रुपयांचे झुमके, असे 47 हजार 500 रुपयांचे दागिने चोरून नेले. दोन्ही घटनांमध्ये एकूण एक लाख 17 हजार 500 रुपयांचे दागिने चोरीला गेले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.