घटना दुरूस्ती  केल्यास मराठा समाजाला आरक्षण – शरद पवार

573

कोल्हापूर, दि. २८ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण  मिळवून  देण्यासाठी घटनेत दुरूस्ती करता येणे शक्य आहे. याबाबतचा  निर्णय जर केंद्र सरकारने घेतला, तर विरोधकांना त्याची गरज मी समजावून सांगेन अशी ग्वाही  राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे दिली. घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,  असेही पवार म्हणाले.

कोल्हापुरातील दसरा चौकात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला शरद पवारांनी भेट दिली. त्याआधी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीत साप सोडण्याच्या केलेल्या विधानामुळे   मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने लवकरात लवकर सोडवावा राज्यात सध्या निर्माण झालेली परिस्थिती राज्याच्या हिताची नाही, असेही पवार यांनी  स्पष्ट केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने तयारी दर्शवली तर विरोधकांना मी त्याची गरज समजावून सांगेन अशीही भूमिका पवारांनी घेतली आहे. तसेच सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे, असेही  पवार म्हणाले.

भाजपने सत्तेवर येताच शंभर दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आता न्यायालयीन प्रक्रिया पुढे करून मराठा आरक्षण लांबवणे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर घटना दुरूस्ती केल्याने ते शक्य आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे, त्यांनी या   प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पवार म्हणाले आहे.