ग्राहकाला पिशवीसाठी तीन रुपये आकारणाऱ्या बाटाला नऊ हजाराचा दंड

127

चंदीगढ, दि. १५ (पीसीबी) – सेवेत त्रुटी आढल्याबद्दल बाटा इंडिया लिमिटेडला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंदिगमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल बाटाविरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदिगड ग्राहक मंचाने बाटाला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे.

चंदिगडचे रहिवासी असणारे दिनेश यांनी आपल्या तक्रारीत सांगितलं होतं की, आपण ५ फेब्रुवारी रोजी बाटामधून शूज विकत घेतले होते. यासाठी आपल्याला ४०२ रुपयांचं बिल देण्यात आलं. यामधील तीन रुपये पेपर बॅगसाठी आकारण्यात आले होते. दिनेश यांनी सांगितलं आहे की, आपल्याला तीन रुपये आकारत बाटा पिशवीच्या सहाय्याने आपल्या ब्रँण्डचं प्रमोशन करत होतं जे चुकीचं आहे.

तक्रारदार दिनेश यांनी सेवेत त्रुटी आढळल्याबद्दल तीन रुपये रिफंड करण्याची तसंच भरपाई देण्याची मागणी केली. बाटा इंडियाने मात्र आरोप फेटाळून लावले. ग्राहक मंचाने पिशवीसाठी पैसे आकारणे सेवेत त्रुटीच आहे आणि आपली वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे असं ग्राहक मंचाने सांगितलं आहे. ग्राहक मंचाने बाटा इंडियाला आपल्या सर्व ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचा आदेश दिला आहे.

ग्राहक मंचाने बाटा इंडियाला पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा कऱण्यास सांगितलं आहे. तसंच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ३००० रुपये भरपाई म्हणून देण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात ५ हजार रुपये डिपॉझिट करण्यास सांगण्यात आलं आहे.