गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड हिटलिस्टवर

65

बेंगळुरू, दि. १४ (पीसीबी) – कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने आरोपींकडून एक डायरी ताब्यात घेतली आहे. त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अभिनेते गिरीश कर्नाड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक बी. टी. ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे प्रमुख वीरभद्र चन्नामल्ला स्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते सी. एस. द्वारकानाथ यांची मारेकऱ्यांच्या डायरीत नावे आढळून आली आहेत. या व्यक्ती कट्टरवादी हिंदुत्वाच्याविरोधात असल्याचे डायरीत नमूद केले आहे.

दरम्यान, एसआयटीने कर्नाटकातील विजयपूरा जिल्ह्यातील सिंधागीमधून २६ वर्षाच्या परशूराम वाघमारे याला ताब्यात घेतले होते. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील त्याच्या भूमिकेविषयी नंतर माहिती देण्यात येणार असल्याचे एसआयटीने सांगितले होते. वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाघमारेसारखी दिसणारी आहे. परशूराम वाघमारे हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे.