गोव्यात राजकीय हालचालींना वेग; काँग्रेस नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार ?

46

पणजी, दि. १७ (पीसीबी) –  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे येथील  राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. काँग्रेसने शनिवारी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला  असतानाच  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दिल्लीत आज (रविवार)  सकाळीच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक  झाली.  दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत असून ते भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. २००५ साली कामत यांनी भाजपला रामराम करून  काँग्रेसमध्ये  प्रवेश केला होता. २००७ ते २०१२ या काळात ते  गोव्याचे मुख्यमंत्री होते.

दरम्यान,  काँग्रेसचे काही आमदारही आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, काँग्रेसने कामत यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. भाजपला सत्ता जाण्याची धास्ती  वाटू लागल्याने चुकीच्या बातम्या पसरवत आहे, असे  काँग्रेसने म्हटले आहे.