गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्री आजारी; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी

92

पणजी, दि. ३ (पीसीबी) – गोव्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि अन्य दोन मंत्र्यांची अनुपस्थिती आहे. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट उभे राहिले आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यातील प्रशासन व्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे करणार असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रमाकांत खलप यांनी सांगितले.

प्रकृती अस्वास्थामुळे पर्रीकर सातत्याने गैरहजर असतात. पर्रीकर सध्या उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. त्यांनी आपला प्रभारही दुसऱ्यांकडे दिलेला नाही. त्याचबरोबर गोव्याचे ऊर्जा मंत्री पांडुरंग मडकाईकर आणि शहर विकास मंत्री फ्रान्सिस डिसुजा हेही आजारी आहेत. पर्रीकर आणि हे दोन्ही मंत्री राज्यात कधीपर्यंत परतणार हे निश्चित नाही. त्यामुळे  राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे खलप यांनी म्हटले.

पर्रीकर हे याचवर्षी मार्च ते जून दरम्यान उपचारासाठी अमेरिकेत गेले होते. ते पुन्हा १० ऑगस्टला अमेरिकेला आणि २२ ऑगस्टला परतले होते. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मुंबईतील एका खासगी रूग्णालयात दाखल झाले होते. आता ते पुन्हा एकदा अमेरिकेला गेले आहेत. ते ८ सप्टेंबरला भारतात परतणार आहेत.