गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

133

गोवा, दि. १७ (पीसीबी) – देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय ६३) यांचे आज (रविवार) प्रदीर्घ आजाराने  निधन झाले.  शनिवारपासूनच त्यांची प्रकृती खालावली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मनोहर पर्रीकर यांना झोपूनच रहावे लागत होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी झाला होता. गेल्या पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब  अचानक कमी झाला होता.  त्यांना कृत्रिम ऑक्सिजन  देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी सायंकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

पर्रीकर यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. गेल्या एक वर्षापासून पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. यावर त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालय, अमेरिका आणि दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु होते.

पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोहर पर्रिकर यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.