‘टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर’; राम कदमांवर जितेंद्र आव्हाडांचा निशाणा

1069

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – ‘टाक घोड्यावर आणि ने वाड्यावर’, असे करायला आमदार म्हणजे काही राजा नाही. आजचे राज्य हे लोकशाहीचे, कायद्याचे राज्य आहे. मुलीला पळवून आणण्याचे आमदार राम कदम यांचे विधान भीतीदायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.  

भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात मुलीविषयी वादग्रस्त विधान केले होते. तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो, असे म्हणत राम कदम यांनी मुक्ताफळे उधळली.

यावेळी आव्हाड म्हणाले की, एका मुलीचा बाप म्हणून मला भीती वाटायला लागली. जर राम कदमांच्या मतदारसंघातील एखादा मुलगा माझ्या मुलीच्या मागे लागला, तर हे माझ्या मुलीला उचलून घेऊन जायचे. बाप म्हणून मला काळजी वाटायला लागली. अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. पोरगी किंवा पोरगा हा मतभेद नाही, ही गुन्हेगारी आहे.

अशा वक्तव्यांमुळे लोकांची हिम्मत वाढते. राम कदमांसारखा मोठा, पैसेवाला आमदार, मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार असे बोलत असेल, तर नक्कीच भीतीदायक आहे, असे   आव्हाड म्हणाले.