गोळीबारातील आरोपीला पाठलाग करुन पकडल्याने हिंजवडीतील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून पाच हजारांचे बक्षीस

1212

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकात एकावर गोळीबार करून पळून जाणाऱ्या आरोपीला पाठलाग करून पकडणाऱ्या हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

अतुल इंगळे आणि शिवाजी अहिवळे असे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या हिंजवडी पोलिस ठाण्यातील या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठ चौकात शनिवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास समीर येनपुरे याच्यावर गोळीबार झाला होता. आरोपी शुक्राचार्य मडाळे हा गोळीबार करुन  पाषाणच्या दिशेने पळाला होता. त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून तो पुढे जात होता. यावेळी हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली असताना पोलीस कर्मचारी इंगळे व अहिवळे यांनी शुक्रचार्य याच्या कंबरेचे पिस्तूल दिसले. त्यांनी तातडीने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केल्याचे समजताच पोलिस आयुक्त  आर. के. पद्मनाभन यांनी  अतुल इंगळे आणि शिवाजी अहिवळे  या दोघांना अभिनंदन करुन पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. तर उपायुक्त नम्रता पाटील यांनी त्या दोघांचा सत्कार केला. यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे आदी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.