‘गोकुळ’ दुध संघाच्या संपर्क मेळाव्यात तुफान हाणामारी

270

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक संघाच्या करवीर तालुका संपर्क मेळाव्या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी झाली. दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारे राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब विश्‍वास नेजदार यांनी केला. यावेळी नेजदार यांनी विश्वास पाटील यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने काहींनी त्यांना जबर मारहाण केली.  दुसरीकडे, वार्षिक सभेच्या अपुर्‍या जागेवरुन संचालक वसंत खाडे आणि माजी संचालक बाबासाहेब चौगले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. फक्‍त करवीर तालुक्याच्या संपर्क सभेसाठीच ही जागा अपुरी पडत असताना सर्वसाधारण सभा या ठिकाणी कशाला घेता, असा जाब चौगले यांनी विचारल्यानंतर त्यांच्याही दिशेने कार्यकर्त्यांनी धाव घेतली. यावरुन खाडे-चौगले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान,  या दोन्ही घटनांचा गोकुळ बचाव कृती समितीच्या सदस्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.