गॅस सिलिंडरवरील अनुदान सोडलेल्या ग्राहकांना पुन्हा अनुदानाचा लाभ मिळणार  

383

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान सोडलेल्या किंवा आतापर्यंत  अनुदानाच्या सवलतीचा लाभ न घेतेलेल्या ग्राहकांना आता पुन्हा अनुदान घेता येणार आहे. अनुदान सोडलेले सुमारे दोन कोटी ग्राहक वाढत्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे  या ग्राहकांनी पुन्हा अनुदान मिळेल का, अशी चौकशी करायला सुरुवात केली होती. त्यामुळे केंद्र सरकारने या ग्राहकांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनुदानाचा लाभ त्यांना पुन्हा घेता येणार आहे.   

तेलाच्या वाढत्या दरवाढीमुळे अनुदान सवलत सोडणाऱ्या ग्राहकांना ही सवलत सोडल्याचा पश्चात्ताप होत असेल, तर त्यांच्यासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.  इंधनाच्या दरात वाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांत अनुदान नसलेल्या गॅस सिलिंडरच्या  दरात ३८९ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ ७९ टक्के आहे. यानंतर अनुदानपात्र गॅस सिलिंडरचा भाव या दोन वर्षांत १७.६ टक्के वाढला आहे. म्हणजेच १४ किलोंच्या घरगुती सिलिंडरवरचे अनुदान दोन वर्षांपूर्वी ६२.९ रुपये होते ते वाढून ३७६.६ रुपये झाले आहे. ही वाढ ६ टक्के इतकी आहे.

देशात २४.५ कोटी घरगुती गॅसचे ग्राहक आहेत. यापैकी ८.३ टक्के म्हणजेच सुमारे २ कोटी ग्राहकांना अनुदान मिळत नाही. सुमारे १.०४ कोटी ग्राहकांनी गेल्या काही वर्षांत अनुदान सवलत घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘गिव्ह इट’ मोहिमेंतर्गत तेल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना हा नवा पर्याय दिला होता. ज्यांना अनुदान सवलत नको असेल, त्यांना पहिल्यापासूनच ही सवलत नाकारण्याचा पर्याय दिला. तर अनुदान मिळण्यासाठी बँकेत खाते किंवा आधारचा तपशील  दिलेला नाही, अशा ग्राहकांना अनुदान दिले जात नाही.