गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप करणारे परमबीर सिंह निलंबित

91

मुंबई, दि. 2 (पीसीबी): महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबना संदर्भातील फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. गृह विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केले. तसेच एका खात्याचे प्रमुख असूनही ते वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपका ठेवण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनामुळे महाराष्ट्र पोलिसांवर नामुष्की ओढावली आहे. एखाद्या अति वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

एकीकडे कामावर रुजू होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारसोबत पंगा घेणाऱ्या परमबीर यांना घरचा रस्ता दाखवला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी ते चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते.

राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर देबाशिष चक्रवर्ती यांनी हा अहवाल सरकारला सादर केला आहे. चक्रवर्ती यांनी याआधी अतिरिक्त मुख्य सचिवपदी असताना परमबीर सिंह यांच्याविरोधात चौकशी केली. ऑल इंडिया सर्व्हिस रुल अंतर्गत नियमांचा भंग केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांना दोषी ठरविण्यात आले आहे. समितीमध्ये संपूर्ण अँटेलिया प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धीतीने हाताळल्याचा ठपका समितीकडून ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असणाऱ्या अधिकाऱ्याने सरकारला या संपूर्ण प्रकरणात अंधारात ठेवल्याचेही समितीने म्हटले आहे. सर्व्हिस रुलचा नियमभंग केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याचेही समितीने सुचवले होते. देबाशिष चक्रवती यांनी परमबीर सिंह यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फाईवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला गेला आहे