गुलटेकडी येथे सराईत गुन्हेगाराला दोन पिस्टल आणि एक गावठी कट्यासह अटक

387

पुणे, दि. १३ (पीसीबी) – एका सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करुन त्यांच्या जवळून तब्बल दोन पिस्टल, एक गावठी कट्टा तसेच दहा पिस्टलचे राऊंड आणि दोन गावठी कट्याचे राऊंड जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई आज (सोमवार) स्वारगेट पोलिसांनी गुलटेकडी येथील डायसप्लॉट येथे केली.

पिंट्या गुप्ते (रा. डायसप्लॉट, गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हर्षल दुडम यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून पिंट्या गुप्ते हा गुलटेकडी येथील डायसप्लॉट येथे पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. यावर स्वारगेट पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. मात्र पिंट्याला संशय आला आणि तो तेथून पळू लागला. पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळील बॅगेत दोन देशी बनावटीचे पिस्टल, एक गावठी कट्टा तसेच दहा पिस्टलचे राऊंड आणि दोन कट्ट्याचे राऊंड असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन पिंट्याला अटक केली आहे. स्वारगेत पोलिस तपास करत आहेत.