गुगलवर शोधूनही सापडत नाहीत ‘अच्छे दिन’; काँग्रेसने उडवली पंतप्रधानांची खिल्ली

35

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकण्याआधी अच्छे दिन आएंगे असे म्हटले होते. मात्र गेल्या चार वर्षात विरोधकांनी या ‘अच्छे दिन’ च्या घोषवाक्याचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाला बुरे दिन आल्याची टीका विरोधकांनी कायमच केली आहे. आता त्यात एका मीमचीही भर पडली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांनी एक मीम ट्विट केला आहे. या मीममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांना भेटले आहेत. ते सुंदर पिचईंना प्रश्न विचारत आहेत की हल्ली भारतीय लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात त्यावर सुंदर पिचई यांनी अच्छे दिन असे उत्तर दिले आहे. शशी थरूर यांनी हे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अच्छे दिनच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. ‘अ क्लासिक’ असे शीर्षक देऊन हे मीम ट्विट करण्यात आले आहे.

नोटाबंदीचा निर्णय, जीएसटीचा निर्णय या सगळ्यावरून काँग्रेसने कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. तसेच भाजपा सत्तेवर आल्यापासून सामान्य माणूस देशोधडीला लागला आणि व्यापारी वर्गाचे भले झाले अशीही टीका केली आहे. अशात आता या मीमची भर पडली आहे. शशी थरूर यांना काही दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणात जामीन मिळाला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करत काँग्रेसचे अनेक नेते बेलवर बाहेर आहेत म्हणून या पक्षाला लोक आता बैलगाडी म्हणून लागले आहेत अशी टीका जयपूरमध्ये केली होती. आज शशी थरूर यांनी अच्छे दिन संदर्भातले हे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांनी हे मीम ट्विट करताच काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर काहींनी त्यांची बाजू घेत आता मोदींचे भक्त गुगलवर बंदी आणण्याची मागणी करतील असे रिप्लाय दिले आहेत. काही नेटकऱ्यांनी तर अच्छे दिन कसे आले आहेत हे फोटो ट्विट करत सांगितले आहे. तर अनेकांनी शशी थरूर यांचीच खिल्ली उडवत त्यांना ट्विटरवर ट्रोल केले आहे.