गुंठेवारीने बांधकामे नियमित करण्यासाठी पीएमआरडीए कडे फक्त १०,००० अर्ज

82

पिंपरी, दि. १६ (पीसीबी )- गुंठेवारी पद्धतीने विकसित झालेली बांधकामे नियमित करण्यासाठी 31 मे 2022 पर्यंत अंतिम मुदत असून पीएमआरडीए कडे फक्त १०,००० अर्ज आले आहेत.

राज्य शासनाने गुंठेवारी अधिनयम 2001 मध्ये अलिकडेच सुधारणा केल्या आहेत. पीएमआरडीएने त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील गुंठेवारीत झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. आता दि.31 डिसेंबर 2020 पूर्वीची बांधकामे नियमित करता येणार आहे. नोंदणीकृत वास्तुविशारद किंवा नोंदणीकृत स्थापत्य अभियंतामार्फत अर्ज दाखल करावे लागणार आहे. अनधिकृत बांधकामधारकांनी यासाठी सातबारा उतारा, स्ट्रक्‍चरल इंजिनिअरकडून स्थैर्य प्रमाणपत्र दाखला (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) तसेच 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे बांधकाम असल्याबाबतचा गुगल नकाशा व तसेच इतर कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. “पीएमआरडीए’च्या हद्दीत 700 पेक्षा अधिक गावांचा समावेश होतो. पालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहेत. या 23 गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यामुळे त्याची नोंद होणे आवश्‍यक आहे. पण, नागरिकांनी अर्ज केलेला नसल्याने प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.