गावच्या नाक्यावर मित्रांसोबत उभे राहणे एका तरुणाच्या जिवावर बेतले

154

 

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – वारंवार विनंती करुन घराबाहेर न पडण्याची विनंतीला फाटा देऊन गावच्या नाक्यावर मित्रांसोबत उभे राहणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना गुरुवारी सकाळी पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावात घडली.

राजेंद्र अभिमन्यू पाटील (वय ३८ वर्षीय ) असे या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र हे ओएनजीसी कंपनीमध्ये कंत्राटी काम करत होते.गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र त्याच्या काही मित्रांसोबत नाक्यावर उभा होता. पोलिसांची गाडी आल्याचे कळताच नाक्यावरील सर्व तरुणांनी धूम ठोकली. पोलीस माग येत असल्याच्या संशयाने सैरावैरा पळणाऱ्या तरुणांमधील राजेंद्रने एका इमारतीमध्ये प्रवेश केला. या इमारतीमधील पायऱ्यांवरुन राजेंद्रचा तोल गेल्याने तो डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेतील राजेंद्रला तातडीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत राजेंद्र यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. राजेंद्र यांचा मृत्यू जखमी झाल्यानंतर हदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अहवालात डॉक्टरांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी अकारण बाहेर पडू नये. पोलीस आले म्हणून पळ काढणे व त्यानंतर स्वत:चा जीव गमावणे हे करोनाच्या प्रसारापेक्षाही धोकादायक आहे. करोना विषाणूची बाधा झाल्यास त्यावर उपचार करुन तो रुग्ण बरा होतो. अशापद्धतीने पळाल्याने जीव गमवावा लागला. सरकारी यंत्रणेच्या आवाहनाची दखल घेऊन नागरिकांनी घरीच सुरक्षित रहावे,असे आवाहन पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.

WhatsAppShare