गावकी भावकीच्या राजकारणाला कंटाळून भाजप नगरसेवक ‘आप’ मध्ये प्रवेश करणार?

166

पिंपरी, दि.१० (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे नऊ ते दहा नगरसेवक आम आदमी पक्षाच्या (आप) संपर्कात आहेत. शहरातील भाजपच्या एकाधिकारशाही व्यवस्थेला; तसेच सर्वपक्षीय गावकी भावकीच्या राजकारणाला कंटाळून नगरसेवक ‘आप’ मध्ये प्रवेश करणार असल्याचे कळत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शहरात आतापासूनच निवडणुकीचे वार वाहू लागले असून, राजकीय घडामोडींना वेग येत आहे. काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे काही नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे पदाधिकारी करीत आहेत. शहराची राजकीय परस्थिती पाहता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा लढा होणार आहे.

त्यामुळे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या राजकीय वातावरणात अचानक ‘आप’ने एंट्री केली आहे. भाजपचे नऊ ते दहा नगरसेवक थेट ‘आप’च्या संपर्कात गेले आहेत. या नगरसेवकांनी ‘आप’च्या राज्यपातळीवरील नेत्यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली आहे. भाजपमधील एकाधिकारशाही, सर्वपक्षीय गावकी भावकीचे राजकारण या प्रकाराला कंटाळून हे नगरसेवक ‘आप’ मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपमध्ये कोणतेही काम करताना ठरावीक दोन नेत्यांना विचारूनच करावे लागते. ते म्हणतील तेच काम करावे लागते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीमध्येही काही ठरावीक लोक पक्ष चालवत असल्याने तेथेही हाच प्रकार सुरू आहे. एकमेकांच्या नातेवाइकांना संभाळणे, भ्रष्टाचाराची प्रकरणे दाबणे हे प्रकार दोन्ही पक्षांमध्ये सुरू असल्याने या नगरसेवकांनी ‘आप’ची वाट धरली आहे.

WhatsAppShare