गायक उदित नारायण यांना आशा भोसले पुरस्कार जाहीर; भाऊसाहेब भोईर यांची माहिती

120

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने सिद्धीविनायक ग्रुपच्या सहकार्याने भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संगीतकार आणि गायकाला सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने दरवर्षी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, “अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने २००२ पासून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या नावाने आशा भोसले पुरस्कार दिला जातो. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे संगीतकार आणि गायकाला आशा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १६ वे वर्ष आहे. आतापर्यंत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलाल, आनंद, ह्दयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांना हा पुरस्कार दिला गेला आहे.

यंदाचा १६ वा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदित नारायण यांना देण्यात येणार आहे. रोख १ लाख ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात येत्या ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्काराचे वितरण केले जाईल. यावेळी आमदार अजित पवार, ज्येष्ठ संगीतकार पंडित ह्दयनाथ मंगेशकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने आदी उपस्थित असतील. यावेळी उदित नारायण यांच्या गीतावर आधारित रजनीगंधा तसेच वैशाली पळसुले यांचे फ्युजन नृत्य हा कार्यक्रम सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”