भाजपने सत्ता मिळण्याच्या आधीपासून आश्वासनांचे गाजर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गाजर म्हणतंय माझं नाव बदला असा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली. भोसरी येथील हल्लाबोल मोर्चातील जाहीर सभेत पवार बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी सभेत बोलताना गॅसचे दर किती असा प्रश्न जनतेला विचारला असता, एका नागरिकाने आठशे रुपये तर दुसऱ्याने ८५० रुपये असल्याचे म्हटले. यावर बोलताना पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत तुझीच लाल असा शब्द वापरला. त्यामुळे सभेतील नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, भाजपाची आढी नासून गेली आहे, ते कशाला आम्हाला नासके म्हणत आहेत. उलट भाजपाचे भाजप मध्ये कसे राहतील याची त्यांनी काळजी घ्यावी, असा पलटवार अजित पवार यांनी पालक मंत्री गिरीश बापट यांच्यावर केला. गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सडके आंबे पक्षात घेऊ नका अशी टीका केली होती, त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.