गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले- मोदी

193

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – देशात गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी अनेकांचे योगदान आणि बलिदान छोटे केले गेले, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील ४ हजार कोटींच्या मोहनपुरा सिंचन प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले.

गांधी परिवाराचे महत्त्व वाढवण्यासाठी देशातील इतर महान व्यक्तींचे योगदान छोटे करून दाखवण्यात आले. हे या देशाचं दुर्दैवं आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. काही लोक सरकारविरोधात अफवा आणि संभ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. पण ते वास्तवापासून दूर आहेत. आरोप करणाऱ्यांना वाट्टेल ते बोलू द्या. त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन करत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

मोहनपुराचा हा सिंचन प्रकल्प ४ वर्षांच्या आत सरकारने पूर्ण केला आहे. हे पाणी शेतापर्यंत पाईपलाइनने पोहचवण्यासाठीची योजना पूर्ण करण्यात आली आहे, असं मोदी म्हणाले. मोहनपुरा धरणाचे काम डिसेंबर २०१४मध्ये सुरू झाले होते. या धरणामुळे १.३५ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे राजगड या दुष्काळग्रस्त भागातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटणार आहे, असे मोदींनी सांगितले.