गांधीनगर, खराळवाडी, कामगारनगरातील नागरिकांचा महापालिका आयुक्तांच्या बंगल्यावर मोर्चा

64

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी येथील गांधीनगर, खराळवाडी, कामगारनगर येथील घरांमध्ये गुरूवारी झालेल्या मोठ्या पावसात पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या परिसरातील नाला आणि गटारीतील साचलेला गाळ महापालिकेच्या यंत्रणेने काढण्यास टाळाटाळ केल्याने पाणी घरात शिरले. नाला व गटारीतील गाळ वेळीच काढला असता तर ही परिस्थिती उद्‌भवली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत  माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला.

गांधीनगर, खराळवाडी, कामगारनगरमध्ये नाला आणि गटारी तुंबलेल्या आहेत. गाळ साचल्यामुळे पाणी वाहून जाण्यास वाव नाही. गुरुवारी (दि. २१) दुपारी जोरदार पावसाने या परिसरात पाणी पाणीच झाले होते. गटारी तुंबल्याने पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. तसेच   खराळवाडी येथील जामा मशिदीच्या मागीलच्या बाजूस असलेला नाला महापालिकेच्या एका ठेकेदाराने बुजविला आहे. त्यामुळे येथे मशिदीसह आसपासच्या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते.

यावेळी माजी नगरसेवक कैलास कदम आणि परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत आठ दिवसात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी गांधीनगर, खराळवाडी आणि कामगारनगर परिसरातील पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी  कैलास कदम यांनी आयुक्तांकडे  केली.