गांधीजींच्या सर्व विचारांशी मी सहमत नाही – कमल हसन  

117

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मी मोठा चाहता आहे. मी त्यांना माझ्या आयुष्यातील अदृश्य गुरूस्थानी  मानतो. मात्र, त्यांच्या सर्व विचारांशी मी सहमत नाही,’ असे मत तामिळनाडूच्या राजकारणात नुकतेच प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी व्यक्त केले आहे.

‘विश्वरूपम २’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हसन मुंबईत आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपण गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालो आहे. ‘गांधीजींकडून मी सर्व प्रकारचे तार्किक, प्रॅक्टिकल सल्ले घेतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे. मनात आणले, तर एक माणूसही जग बदलू शकतो, हा त्यांचा विचार मला खूप भावतो.

आजच्या युगात आपल्याला अनेक गांधी हवेत,’ असे असले तरी गांधीजींच्या सर्व विचारांशी सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘गांधीजींना सिनेमा आवडत नव्हता. मला सिनेमा खूप आवडतो. खरंतर गांधीजींनी सिनेमाला समजूनच घेतले नाही. त्यांची ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही. आनंदानं जगण्याच्या बाबतीत ते भलतेच गंभीर होते,’ असे हसन म्हणाले.