गांजाला कायदेशीर मान्यता द्या- उदय चोप्राची

312

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – गेला काही काळ रुपेरी पडद्यापासून दूर असणारा अभिनेता उदय चोप्रा सध्या मात्र एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. उदयने केलेले एट ट्विट सध्या सर्वांचच लक्ष वेधत आहे. मारिजुआना म्हणजेच गांजाला कायदेशीर परवानगी द्या अशी मागणी त्याने एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

‘माझ्या मते भारतात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली पाहिजे. सर्वप्रथम तर हा आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात आली तर त्यावर आकारल्या जाणाऱ्या करातून बराच नफाही मिळू शकतो’, असे ट्विट त्याने केले. त्यासोबतच गांच्याचे वैद्यकीय फायदे असल्याचेही त्याने या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

गांजाला कायदेशीर मान्यता देणे हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हणत उदयने मांडलेली त्याची भूमिका सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. मुख्य म्हणजे त्याच्या ट्विटची अनेकांनीच खिल्लीही उडवली. हा सर्व प्रकार पाहता खुद्द उदयने पुन्हा एक ट्विट केले. ज्या ट्विटमधून आपण गांजा किंवा अशा कोणत्याच प्रकारच्या पदार्थाचा वापर करत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. तेव्हा आता गांजाला कायदेशीर मान्यता मिळते की नाही ही बाब दूर राहिली पण, तूर्तास उदयच्या या ट्विटमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे हेसुद्धा तितकच खरे.