गरोदर महिलेसोबत अश्लील चाळे केल्याने पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयातील डॉक्टराविरोधात गुन्हा

211

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – गुप्तांगांना हात लावून गरोदर महिलेसोबत अश्लीलचाळे केल्याने पिंपरीतील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयातील एका डॉक्टरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.२३) दुपारी अडीचच्या सुमारास रुग्णालयातील लेबर रुम वॉर्ड ५८ मध्ये घडली.

याप्रकरणी गरोदर २० वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. हर्षल बसवराज निबान्नवर (वय २८, रा.फ्लॅट क्र. ३०१, तुलीप हाईट्स वाघेरे टॉवर, नेहरुनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २० वर्षीय तरुणी या गरोदर आहेत. त्या घरात काम करत असताना पडल्या होत्या यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे त्या रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास उपचार घेण्यासाठी संत तुकारामनगर येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल झाल्या. यावेळी तेथे उपस्थित डॉ. हर्षल याने महिलेच्या अंगाला वारंवार हात लावला, तसेच तुम्हाला बरे वाटून अगर न वाटून ४ दिवस अॅडमीट व्हावेच लागेल, असे म्हणाला. काही वेळाने हर्षलने महिलेच्या तपासणी दरम्यान तिच्या गुप्तांगाला हात लावून विनयभंग केला, असा महिलेचा आरोप आहे.

मात्र डॉ हर्षल यांनी चौकशी दरम्यान सांगितले की हा तपासणीचा भाग असून महिलेच्या तपासणी दरम्यान त्या ठिकाणी काही महिला डॉक्टर देखील उपस्थित होत्या. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हरीदास बोचरे करत आहेत.