गतिरोधकावरून दुचाकी उडाली; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

58

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – भरधाव वेगात दुचाकी चालविल्याने गतिरोधकावरून दुचाकी उडाली. त्यात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 16) रात्री दहा वाजताच्या सुमारास हॉटेल शेतकरी मळा समोर, चिंचवड येथे झाला.

विशाल ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस फौजदार यु एन सांडभोर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विशाल गायकवाड त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / ए के 3293) थरमॅक्स चौकाकडून खंडोबा माळ चौकाकडे जात होता. हॉटेल शेतकरी मळाच्या समोर आल्यानंतर रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून त्याची दुचाकी उडाली. त्यावेळी तोल न राहिल्याने विशाल दुचाकीसह रस्त्यावर पडला.

यावेळी त्याच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात विशाल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विशालच्या विरोधात तो स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहाय्यक पोलीस फौजदार मंगल गायकवाड तपास करीत आहेत.