गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस सज्ज; 7 हजारहून अधिकचा तगडा पोलिस बंदोबस्त

46

पुणे, दि. ११ (पीसीबी) – यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली असून विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीत तब्बल ७ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मिरवणूक मार्गावर बीडीडीएसच्या सात टीम. त्याचबरोबर पाच शीघ्र कृती दल, वज्र, वरून, पाच दंगल नियंत्रण पथक आणि सहा स्ट्रायकिंग फोर्स असा तगडा बंदोबस्त असणार आहे.

पोलिस आयुक्त डॉ . के. वेंकटेशम, यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० पासून पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीत तब्बल ७ हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मार्गावर १६९ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये एकूण ३७७ बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला. त्याचबरोबर गणेश मंडळाच्या ३० हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मानाच्या गणपतीसमोर तीन ढोलपथक तर, इतर गणपतींच्या समोर दोन ढोल पथकांना परवानगी देण्यात आली आहे.

ढोल पथकातील एकूण सदस्यांची संख्या १०० पर्यंत ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली. शहरातील १७ रस्ते ठराविक अंतरावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. यावेळी इतर मार्गावरून ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड ही तयार करण्यात आला आहे.