रामनगरमध्ये गणेश उत्सवाची वर्गणी न दिल्याने दोघांना जबर मारहाण; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणालाही केले जखमी

680

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तिघा टोळक्यांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एका वडापाव विक्रेत्यालाही गंभीर जखमी केले.  ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री आठच्या सुमारास रामनगर चिंचवड येथील राम मंदिरासमोरील वडापावच्या गाडीवर घडली.

किसन गायकवाड, किरण विटकर, मयूर संजय विटेकर (वय १९, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.  याप्रकरणी त्यांनी  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव माने (वय २२), रमजान शेख (वय १९, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) आणि त्याचा एका  साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर याची रामनगर मधील राम मंदिरासमोर वडापावची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी वैभव, रमजान आणि त्यांचा आणखी एक साथीदार वडापावच्या गाडीजवळ गणेश उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी मयूर याचा मित्र किसन गायकवाड आणि किरण विटकर हे दोघे गाडीजवळ थांबले होते. आरोपींनी किसन याला गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी आणि किसन यांच्यामध्ये वाद सुरु झाले. वैभव याने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान आणि अन्य एका आरोपीने किरण याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभव याने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू मयूरच्या डोक्यात मारला. यामध्ये मयूर गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप फरार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करत आहेत.