गणित चुकल्याने दुसरीतील विद्यार्थ्याच्या तोंडात छडी कोंबली; रूबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू

0
551

गणित चुकल्यामुळे गुरुजीने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.१०) अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळवाडी गावात घडला. विद्यार्थ्याच्या घशाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  

रोहन दत्तात्रय जंजिरे (वय ८) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याची आई सुनिता दत्तात्रय जंजिरे (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चंद्रकांत सोपान शिंदे (रा.राशीन, ता.कर्जत, अहमदनगर) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहन सकाळी ७ वाजता पिंपळवाडीतील शाळेत गेला होता. दुपारी त्याचे आजोबा त्याला शाळेतून आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याचा तोंडातून रक्त येत आसल्याचे त्यांना दिसले. याबाबत त्यांनी शाळेत चौकशी केली असता गणित चुकल्यामुळे गुरूजींनी लाकडी छडी तोंडात घातल्याचे सांगितले. तसेच याविषयी कोणाला सांगितले तर मारण्याची धमकीही शिंदे यांनी दिली होती.

दरम्यान, रोहनला बारामतीतील डॉ. निंबाळकर हॉस्पिटमध्ये दाखल केले. मात्र, घशाला गंभीर दुखापत झाल्याने तेथील डॉक्टरांनी त्याला रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितले. सध्या रोहनवर रुबी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू आहेत.