गणपतीची वर्गणी हवी असेल तर ३० पर्यंतचे पाढे येणे आवश्यक

766

जळगाव, दि. ६ (पीसीबी) – जळगाव गणपतीची वर्गणी हवी असेल तर मंडळाच्या सदस्याला ३० पर्यंतचे पाढे येणे असल्याच अट जळगावच्या जामनेरमधील जडे बंधू ज्वेलर्सने घातली आहे. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गणपती म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. काही दिवस आधीच बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला सुरुवात होते. बच्चे कंपनीही आपल्या लाडक्या बाप्पाच्या तयारीसाठी पुढे असतात. मात्र यामध्ये बच्चे कंपनीचे अभ्यासाकडे काहीसे दुर्लक्ष होते.

हीच बाब लक्षात घेत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जडे बंधू ज्वेलर्सने आपल्याकडे गणपतीची वर्गणी मागायला येणाऱ्या बालमित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांना वर्गणी हवी असल्यास ३० पर्यंत पाढे येणे आवश्यक असल्याची अट घातली आहे. या निमित्ताने गणपती दरम्यानही विद्यार्थ्यांना आपला अभ्यास करावा लागणार आहे, ज्याचा फायदा या मुलांना भविष्यात होईल, असे जडे बंधू ज्वेलर्सने म्हटले आहे.

जडे बंधू ज्वेलर्सचे आव्हान स्वीकारत बच्चे कंपनीने थेट त्यांच्या दुकानात जाऊन पाढे म्हणून आपला वर्गणी मिळविण्याचा हक्क कायम ठेवला. तर बऱ्याच मंडळांना पाढे पाठ नसल्याने वर्गणीपासून दूर राहावे लागले आहे. जडे बंधू ज्वेलर्सच्या या अनोख्या अटीचे सर्वांकडून स्वागत होत आहे.