गडीत उभारलंय ‘ज्ञानशक्ती मंदिर’; शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह यांच्या हस्ते शुक्रवारी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा..

41

पिंपरी, ८ डिसेंबर – शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या पुढाकाराने निगडीतील सेक्टर २६ दुर्गेश्वर पथ येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानी आणि गणपती अशी दोन मंदिरे शेजारी-शेजारी उभारली आहेत. संकेश्वर पीठाचे शंकराचार्य जगत् गुरु अभिनव विद्यानृसिंह यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी (दि.१०) मंदिरांमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी दिली.

सविस्तर माहिती देताना नगरसेवक अमित गावडे म्हणाले, निगडी प्राधिकरणात आई तुळजाभवानी आणि श्री गणेश या दोन्ही देवतांची एकत्रित मंदिरे असावीत अशी नागरिकांची मागणी होती. दुर्गेश्वर मित्र मंडळ, दुर्गेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आणि नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मंदिरासाठी वर्गणी दिली. या वर्गणीतून दोन्ही मंदिरे शेजारी-शेजारी उभारण्यात आली आहेत. मंदिराचे काम पूर्ण झाले असून येत्या शुक्रवारी मंदिरांमध्ये श्री गणपती व श्री तुळजाभवानी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
यानिमित्ताने शुक्रवार आणि शनिवारी विविध कार्यक्रम आयोजन केले आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळी साडेसहा ते सायंकाळी सहापर्यंत उदकशांत, वास्तुशांत, मातृकापूजन, पुण्याहवाचन, नवग्रहपूजन, नवग्रह होम, वास्तू होम, मुख्य देवता होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा, पंचोपचार पूजा, महाआराती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १२ ते १ या वेळेत श्री शंकराचार्यांची पाद्यपूजा आयोजित केली आहे. सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत ‘भक्तीसुधा’ हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांचे बासरीवादन तसेच चैतन्य कुलकर्णी, संदीप उबाळे आणि रश्मी मोघे यांचा सदाबहार भक्तीगीतांचा स्वरमय आविष्कार सादर होईल. प्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक, मराठी संगीत भूमीवर काम करणारे रविंद्र खरे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
शनिवारी (दि.११) सकाळी साडेसहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मुख्य देवता पूजन, उत्तरांग होम, पूजांगहोम, कलशारोहण, वास्तुनिक्षेप मूर्ती प्राणप्रतिष्ठा, बलिदान पूर्णाहुती, महापूजा, उत्तरांग पूजा, अभिषेक, श्रेयोग्रहण आणि महाआरती होईल. सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ यावेळेत संजय महाराज पाचपोर यांचे कीर्तन होईल. त्यांना अशोक इदगे महाराज आणि त्यांचे सहकारी साथ देतील. या धार्मिक कार्यक्रमांना प्रभागातील नागरिकांनी आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेवक अमित गावडे यांनी केले आहे.