गडचिरोलीत पावसाचे तांडव; पाण्यातील विजेच्या धक्क्याने २५ जनावरांचा मृत्यू

86

गडचिरोली, दि. ८ (पीसीबी) – राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात तब्बल २५ मुक्या जनावरांना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) सकाळी अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटपूरकडे जाणाऱ्या वीजेच्या तारा देवलमरी नाल्यातून जातात. पावसामुळे विजेच्या या तारा पाण्यात बुडाल्या होत्या. आज सकाळी या नाल्यामधून परत जात असलेल्या २५ जनावरांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि सर्व जनावरांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.