‘गझलपुष्प’ च्या गझल मुशायऱ्याने पुन्हा एकदा “श्री गणेशा”

67

पिंपरी, दि.२७ (पीसीबी) : महाराष्ट्रात मागच्या जवळपास दोन वर्षांपासून खंडीत झालेली गझल मुशायऱ्याची परंपरा काल पिंपरी चिंचवड मधून पुन्हा एकदा सुरु झाली. निमित्त होते ‘गझलपुष्प’ या संस्थेच्या गझल मुशायऱ्याचे.

‘पिंपरी चिंचवड मनपा’ च्या चिंचवड येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत रविवार दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सदर मुशायरा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन मा. गजानन चिंचवडे आणि ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांचे हस्ते शमा प्रज्वलन करून करण्यात आले. ह्या कार्यक्रमात गझलपुष्प चे सदस्य सारिका माकोडे, सरोज चौधरी, अभिजित काळे, संदीप जाधव, प्रशांत पोरे तसेच पाहुणे गझलकार डॉ. अमितकुमार खातू, चंद्रकांत धस आणि मसूद पटेल यांनी गझला सादर केल्या.

मुशायऱ्याची सुरुवात चंद्रकांत धस यांनी “कोहळा घेऊन तू आवळा देऊ नको, तू भ्रमाचा तेवढा भोपळा देऊ नको” या गझलेने केली. अभिजित काळे यांनीदेखील याच भ्रमावर भाष्य करताना म्हटले की “तुझी जी सावली दिसते तुला आहे, तिला अस्तित्व म्हण केवळ प्रकाशाचे”. आजच्या एकूणच परिस्थितीवर बोलताना संदीप जाधव म्हणतात की “घडवून योगायोग सारा आणला गेला, जमवून पाचोळा निखारा आणला गेला”

नात्यातील दुराव्याबद्दल, त्याच्या ओलाव्याबद्दल बोलताना सरोज चौधरी म्हणाल्या “तुझ्या माझ्यातले अंतर जरा मिटवून पाहू, जिथे मन वेगळे झाले तिथे भेटून पाहू” तर याउलट लटक्या रागाचे वर्णन करताना सारिका माकोडे म्हणाल्या “नको मारूस थापा तू उगी रागात आहे मी. अता भुलणार नाही बघ जरी प्रेमात आहे मी”

डॉ. अमितकुमार खातू यांनी सध्याच्या परिस्थितीवर मार्मिकपणे बोलताना “ज्याची त्याची बौद्धिक उंची असते, कुणाकुणाच्या प्रगल्भतेवर बोलू ?” हा शेर उद्धृत केला तर धर्मांधतेमुळे दुरावत जाणाऱ्या दोन मित्रांमधली सल मांडताना प्रशांत पोरे म्हणाले की “वेगवेगळ्या रंगांमध्ये वाटत गेलो आपण, वेगवेगळ्या रंगांनी मग बाटत गेलो आपण” मुशायऱ्याचे आकर्षण ठरलेल्या ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल यांनी “जीवनाला लागलेला शाप होतो, मोकळे रडता न आले, बाप होतो!” हा शेर सादर करताच उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मुशायऱ्यात सर्वच गझलकारांनी अतिशय उत्तम गझला सादर करून सर्व रसिकांची मने जिंकली.

नगरसदस्या आश्विनीताई चिंचवडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, नवयुग साहित्य मंडळाचे राज आहेरराव, पिंपरी चिंचवड साहित्य मंचाचे राजेंद्र घावटे, समरसता परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.कैलास भैरट,शोभा जोशी, सुभाष चव्हाण, स्वाती ठकार, प्रदीप गांधलीकर,अँड. अंतरा देशपांडे, उज्वला केळकर, सुमन दुबे, मानसी चिटणीस, सौ.धस, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, सुहास घुमरे, निलेश शेंबेकर, महेश खुडे यांनी सहभाग घेतला. ज्येष्ठ गझलकार रघुनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

WhatsAppShare